रविंद्र भद्रगे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- काल राज्यात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण जालना येथे स्वातंत्र्यदिनी उपोषण करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस उपाधीक्षक (डीवायएसपी) यांनी कमरेत मागून ‘फिल्मी स्टाईल’ने जोरदार लाथ मारल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने पोलिस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यदिना निमित्ताने जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे दौऱ्यावर आल्या होत्या, जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबाने सुरू केलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी आंदोलन करणाऱ्या अमित चौधरी यांच्या कमरेत मागून ‘फिल्मी स्टाईल’ने जोरदार लाथ मारल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओत पोलिसांनी एका चिमुकल्या मुलालाही हाताला धरून घेऊन गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या या कृतीवर मोठ्या प्रमाणात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पोलिस प्रशासनावर जोरदार आरोप केला आहे.
काय आहे ही घटना? अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. त्यांचा आरोप आहे की, कौटुंबिक वादातून त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिस आरोपींना पाठिशी घालत असून, फिर्यादींना त्रास देत आहेत. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटून आपली कैफियत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले आणि याचवेळी डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी अमित चौधरी यांच्यावर लाथ मारल्याचा प्रकार घडला.
व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ: व्हिडिओत डीवायएसपी कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कमरेत मागून लाथ मारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, याचवेळी पोलिसांनी आंदोलकांसोबत असलेल्या एका लहान मुलाला हाताला धरून घेऊन गेल्याचेही दिसून येते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पोलिसांच्या या आक्षेपार्ह वर्तनावर आणि लहान मुलाला पकडण्याच्या कृतीवर तीव्र टीका होत आहे. अनेकांनी पोलिसांच्या या ‘फिल्मी’ कारवाईला बेशिस्त आणि अमानवीय ठरवले आहे.
पोलिसांवर कारवाईची मागणी: या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर आणि स्थानिक पातळीवर पोलिस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, पोलिस प्रशासन त्यांच्या न्यायाच्या मागणीला दडपण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही जालन्यात पोलिसांच्या कथित मनमानी कारवायांचे व्हिडीओ समोर आले असून, यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

