सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिठाई व दुपट्ट्यांनी स्वागत्.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- स्थानिक राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी घडामोड राजुरा शहरात उभी राहिली. जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले सुरज ठाकरे यांनी आपल्या शिष्ठमंडळासह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशाने केवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांच्याच नव्हे तर स्थानिक काँग्रेस गोटातही नवे जोशाचे संचार झाले आहेत.
हा प्रवेश सोहळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. पक्षाचा दुपट्टा परिधान करून, मिठाईचा गोडवा आणि जयघोषाच्या निनादात ठाकरे यांच्या प्रवेशाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगरसेवक हरजित सिंग संधू, निराधार योजनेचे माजी अध्यक्ष साईनाथ बतकमववार, अभिजित धोटे तसेच युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अशोक राव यांसारखे स्थानिक राजकारणातील प्रभावी चेहरे हजर होते.
सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी कामगार संघटना ही कामगार हक्क, स्थानिक रोजगार आणि सामाजिक न्यायासाठी लढणारी ओळख निर्माण केलेली संघटना आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला केवळ युवा पिढीचा पाठिंबाच नव्हे तर कामगार वर्गाशी थेट जोडणारे बळ मिळाल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये राजुरा शहरात काँग्रेसची घोडदौड अधिक वेगाने होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मिठाईच्या गोडव्यात लपलेले हे राजकीय पाऊल सत्ताधाऱ्यांसाठी मात्र गंभीर आव्हान ठरू शकते. काँग्रेसने संघटित कामगार वर्गाला सोबत घेतल्याने विरोधकांच्या मतदार समीकरणांना तडा जाण्याची शक्यता वाढली आहे. राजुरा राजकारणातील हा नवा पेच पुढील काही दिवसांत कोणते वारे आणतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

