मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट रेल्वे स्थानकावर बंद झालेले गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत आणि नव्या गाड्यांनाही थांबा द्यावा, या मागणीसाठी वर्धा-बल्लारशाह यात्री संघाने वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि खासदार अमर काळे यांना निवेदन सादर केले आहे. हिंगणघाट हे सुमारे २ लाख लोकसंख्येचे मोठे औद्योगिक शहर असल्यामुळे प्रवाशांना रेल्वे थांब्यांची नितांत आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नगर परिषदेत आयोजित कार्यक्रमात वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे संघटक राजेश कोचर यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे अनेक मागण्या मांडल्या. यामध्ये कोविडमुळे बंद झालेल्या अनेक गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. यामध्ये कोरबा-तिरुवनंतपुरम, इइंदौर-तिरुवनंतपुरम, गोरखपुर-चारलापल्ली, गोरखपुर-यशवंतपूर, कोयंबटूर-जयपुर, मैसूर-जयपूर आणि बरौनी-एर्नाकुलम एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी, पुरी-ओखा, नागपूर-सिकंदराबाद (वंदे भारत एक्सप्रेस), बंगळूर-दानापूर, तिरुवनंतपुरम-नवी दिल्ली, सिकंदराबाद-रायपूर, जोधपूर-ताम्रंबम, सिकंदराबाद-हिसार, कोल्हापूर-धनबाद आणि विशाखापट्टणम-गांधीधाम एक्सप्रेस या नवीन गाड्यांना हिंगणघाटमध्ये थांबा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर, पुणे-काजीपेठ एक्सप्रेस आणि मुंबई-बल्लारशाह एक्सप्रेस गाड्या दररोज चालवल्या पाहिजेत, भुसावळ-वर्धा पॅसेंजरचा विस्तार बल्लारशाहपर्यंत करावा आणि काजीपेठ-अजनी पॅसेंजर तसेच नागपूर-बल्लारशाह पॅसेंजर तात्काळ सुरू कराव्यात, अशा इतर मागण्याही निवेदनात नमूद करण्यात आल्या होत्या.
या मागण्यांवर बोलताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी लवकरच रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. खखासदार अमर काळे यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची अनेकदा भेट घेतली असल्याचे सांगितले. हिंगणघाट हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असल्याने रेल्वे थांबे कमी झाल्याचा उद्योगांवर परिणाम होत आहे, त्यामुळे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आमदार समीर कुणावार यांनीही आपण दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा करू असे सांगत, या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खासदार अमर काळे, आमदार समीर कुणावार, माजी आमदार वसंत बोंडे, माजी नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी, प्रेम बसंतानी, पंढरीनाथ कापसे, सुरेश मुंजेवार, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, प्रा. किरण वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

