विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आल्लापल्ली:- राजे धर्मराव कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनीच शिक्षकांची भूमिका निभावत या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर अनेक विद्यार्थी शिक्षक बनून वर्गात उभे राहिले. या अनोख्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे महत्व तसेच शिक्षकांचे समाजातील स्थान किती मोलाचे आहे हे जाणून घेण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाला विशेष गती देत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपल्या मनोगतामधून शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सुर सर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना जीवनात आदर्श घडविण्यासाठी शिक्षणाची खरी दिशा महत्त्वाची असल्याचा संदेश दिला. यावेळी प्रा. डी. डी. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर राखावा तसेच त्यांच्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे प्रतिपादन केले. तर प्रा. राजुरकर यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याचा गाढा भावनिक सूर अधोरेखित करत परस्पर विश्वास, अनुशासन आणि शिक्षण यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे विचार व्यक्त केले.
विशेष म्हणजे, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनीच यशस्वीरीत्या पार पाडले. त्यामुळे शिक्षक दिनाचे औचित्य अधिक संस्मरणीय झाले. शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने शिक्षक-विद्यार्थी नात्याची नवी ऊर्जा जागवली असून, उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वर्गाने हा दिवस संस्मरणीय ठरल्याचे समाधान व्यक्त केले.

