सोलापूर -बीड -जळगाव रेल्वे मार्ग झाल्यास बीडसह देशाच्या विकासाला नवी चालना मिळेल – सारडा, लाहोटी
श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजे 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे धावणार आहे. हा सुवर्ण दिवस पहाण्यासाठी तीन पिढ्या वाट पहात होती तो सोनेरी दिवस प्रत्यक्षात साकारत आहे त्या बद्दल स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीच्यावतीने सर्वांचे स्वागत पण त्याच बरोबर परळी-बीड-मुंबई हा रेल्वे मार्ग तात्काळ पूर्ण करुन या मार्गावरुन रेल्वे धावली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. तसेच सोलापूर-बीड-छत्रपती संभाजीनगर-जळगाव हा नवा रेल्वे मार्ग जर लवकर पूर्ण झाला तर देश जोडला जाईल आणि मागास बीड जिल्हा विकसित होईल अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये रेल्वे समितीच्यावतीने अध्यक्ष जवाहरलाल सारडा आणि ज्येष्ठ सदस्य सत्यनारायण लाहोटी यांनी केली.
बीड येथील हॉटेल अन्विता येथे स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समिती बीडने गुरुवार दि.11 सप्टेंबर 2025 रोजी सायं.4 वाजता बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाच्या शुभारंभ उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा, ज्येष्ठ सदस्य अॅड.सत्यनारायण लाहोटी, संपादक सुनील क्षीरसागर यांनी संबोधित केले. यावेळी रेल्वे समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देतांना सारडा आणि लाहोटी म्हणाले की, स्व.केशरकाकू क्षीरसागर यांनी अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाची खर्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या मागणीला यश त्या तुलनेने खुप उशीरा मिळत आहे. हा मार्ग पूर्ण होण्यासाठी तीन पिढ्यांना वाट पहावी लागली. ज्यांनी बीडला रेल्वेचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठी संघर्ष केला होता त्या पैकी बहुतांश लढवैय्ये आता हायात राहिलेले नाहीत. आज त्यांना रेल्वेपूर्तीचा नक्कीच आनंद होईल. 1980-82 पासून सुरु झालेला रेल्वेचा हा संघर्ष आता पूर्ण होत असला तरी देखील मागास बीड जिल्ह्याला विकसित होण्यासाठी परळी-बीड-अहिल्यानगर ते मुंबई ही जलद रेल्वे सुरु होणे नितांत गरजेचे आहे. त्या सोबतच जर सोलापूर-धाराशिव-बीड-छत्रपतीसंभाजी नगर-जळगाव हा नवा रेल्वे मार्ग जोडला गेल्यास दक्षिण-आणि उत्तर भारत जोडला जाईल ज्यामुळे देशाच्या विकासाला नवी चालना मिळेल. बीडमध्ये उद्योग व्यवसाय वाढीला लागतील आणि बीडचा चेहरा देखील विकसित जिल्हा म्हणून भविष्यात होईल. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वरील मागण्यांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी आम्ही दि.17 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेमध्ये रेल्वे समितीने रेल्वे मार्गाच्या पूर्ततेसाठी प्रामुख्याने ज्यांनी खर्या अर्थाने यशस्वी प्रयत्न केले त्यामध्ये बीडच्या तत्कालीन खासदार स्व.केशरकाकू क्षीरसागर या रेल्वे मार्गाच्या पूर्ततेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या मागणीवरुन राज्य सरकारने अर्ध्या खर्चाची जबाबदार स्विकारल्यामुळेच हा मार्ग पूर्ण होऊ शकला. यांच्यासह स्व.इंदिरा गांधी, तत्कालीन रेल्वे मंत्री सी.के. जाफर शरीफ, लालूप्रसाद यादव, सुरेश कलमाडी, रावसाहेब दाणवे यांच्यासह स्व.सुंदरराव सोळंके, स्व.विमल मुंदडा, खा.जयसिंगराव गायकवाड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी खा. डॉ.प्रितम मुंडे, विद्यमान मंत्री पंकजा मुंडे, मात्री मंत्री तथा आ.धनंजय मुंडे, खा. रजनी पाटील, खा. बजरंग सोनवणे, आ. संदीप क्षीरसागर, आ. सुरेश धस, बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी जंत्री, सुनील केंद्रेकर, दीपा मुधोळ, अविनाश पाठक, विद्यमान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा रेल्वे आंदोलन समितीचे संस्थापक मदनलाल सारडा यांच्या सर्व सहकारी स्व.संपादक नामदेराव क्षीरसागर, प्रा.सुशीला मोराळे, स्व.अमोल गलधर आदींसह विविध संघटना, लोकप्रतिनिधी, रेल्वे आंदोलन समितीचे सर्व सदस्य यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल समितीच्यावतीने आभार व्यक्त करुन बीडला रेल्वे येत असल्याबद्दल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशसनाचे आभार मानले.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीचे सर्वश्री सदस्य वाय.जनार्दन राव, विलासबापू बडगे, अशोक शेटे, डॉ.अरुण भस्मे, शांतीलाल पटेल, विष्णुदास बियाणी, रामचंद्र जोशी, राजकुमार बंब, मंगेश लोळगे, गोविंद कासट, भास्कर जाधव, सुरेशनाना मेखे, अरुण डाके, तुकाराम साळुंके, मन्मथअप्पा हेरकर, मनमोहन कलंत्री, शिवाजी जाधव, महंमद लईक, वैभव स्वामी यांसह सर्व सदस्य उपस्थित होते.

