हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक मोठी माहिती समोर आली आहे. चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत ‘मैफिड्रोन ड्रग’ या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करत 528 ग्रॅम एम. डी. ड्रग्स जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणात तरुणाई ड्रग्स च्या जाळ्यात फसत आहे. त्यामुळे आज तरुणाई बरबाद होत असल्याचे दिसून येत असताना पोलिसांनी धडक कारवाई करत 528 ग्रॅम एम. डी. ड्रग्स जप्त केले. आरोपी हे ड्रग्स चंद्रपूर येथे कुणाला विकणार होता याची माहिती काढून अशा ड्रग्स विक्रेत्यांवर पण कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास मुंबई येथील वसीम इमदाद खान हा कारने चंद्रपूर येथे एम.डी ड्रग्ज पावडर विक्री करीता घेवुन येणार होता अशी माहिती गुप्तहेराकडून पोलिसांना मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी नागपूर – चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमाक 363 वरील साखरवाही फाट्याजवळील एच. पी पेट्रोल पंप समोर येथे सापळा रचुन वसीम इमदाद खान वय 36 वर्ष यास कारसह ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 26 लाख 40 हजार रुपये किमतीचे 528 ग्रॅम एम. डी. ड्रग्स जप्त करण्यात आले.
तपासात आरोपीकडून प्लास्टिकच्या प्रेसलॉक पिशवीत ठेवलेले 528 ग्रॅम एम.डी पावडर मोबाईल फोन, रोकड, आणि कार असा एकूण 35 लाख 7 हजार 480 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन पडोली, जिल्हा चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

