माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांचे नाव मतदार यादीतून गहाळ.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ संदर्भात नगर परिषदेकडून दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादिवर हरकती दाखल करण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, या प्रारूप मतदार यादीचा सखोल अभ्यास केल्यानंतर गंभीर अनियमितता, मतदारसंख्येतील तफावत आणि प्रभागनिहाय विसंगती समोर आल्याने नागरिक व स्थानिक कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारींकडे लेखी आक्षेप/हरकती सादर केल्या असून, पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राजुरा येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने नागरिकांच्या वतीने वरील आरोप केला आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी सांगितले की, मी 35 वर्षापासून राजुरा नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम करीत आहे. मी माझे नाव वगळण्यासाठी कोणताही अर्ज केला नसतांनाही माझे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. जेव्हा की मी लोकसभा व विधानसभा तसेच प्रत्येक नगर परिषद निवडणुकीत मतदान केले आहे. आमचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी देशपातळीवर पत्रकार परिषद घेऊन मत चोरी चा मुद्दा उचलून धरला तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितले की मतदाराने नाव वगळण्याची मागणी केल्याशिवाय नाव कमी किंवा स्थानांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर मी माझ्या दोन मुली बाहेर गावी स्थाईक झाल्यामुळे त्यांची नावे राजुरा च्या मतदार यादीतून वगळण्यात यावी यासाठी रितसर अर्ज करूनही त्यांची नावे कायम ठेवली आहेत. अशाच प्रकारे शहरातील अनेक नागरिकांची नावांबाबत गोंधळ दिसून येत आहे. तर माजी नगराध्यक्ष अरुण धोटे आणि काँग्रेसने स्थानिक नागरिकांच्या वतीने पुढीलप्रमाणे मुख्य आक्षेप घेतले आहेत.
2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सक्रिय असलेल्या अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये काही संभाव्य उमेदवारांचाही समावेश असून, ही बाब मतदानाधिकारावर गदा आणणारी आणि लोकशाही प्रक्रियेवर आघात करणारी असल्याचे नागरिकांचे मत आहे. प्रत्येक प्रभागातील सुमारे २०० मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात नोंदविण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक १ मधील मतदार प्रभाग क्रमांक ५ किंवा ६ मध्ये दाखल झाल्याचे आढळले आहे. परिणामी मतदारांना आपल्या मूळ प्रभागातील नगर सेवकासाठी मतदान करता येणार नाही, ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. 2024 साली नगर परिषदेची एकूण मतदारसंख्या 26025 होती. 1 जुलै 2025 पर्यंत 636 नवीन मतदारांची भर पडून आणि 48 वगळणी झाल्याने एकूण संख्या 26613 अशी असणे अपेक्षित होती. मात्र, प्रारूप यादीत केवळ 26300 मतदारांचा उल्लेख असून, तब्बल 313 मतदारांचा फरक दिसून येतो.
राज्य निवडणूक आयोगाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतदार यादीसाठी cut-off date १ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. तसेच २०२४ च्या विधानसभेतील मतदार यादीच ग्राह्य धरली जाईल, असे स्पष्ट नमूद आहे. परंतु, प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेल्या यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे दिसत आहे. या सर्व अनियमिततेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याची शेवटची तारीख २८ आक्टोंबर २०२५ असल्याने निवडणूक विभागाने तातडीने सर्व चुका दुरुस्त करून राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जावी, अशी ठाम मागणी केली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, जकाँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, जिल्हा महासचिव एजाज अहमद, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, आनंद दासरी, रवी त्रिशूलवार, संतोष गटलेवार, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अनंता ताजने, हेमंत झाडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

