प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- काल वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे) देवळी, पुलगाव व आर्वी या सहा नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी झाली. यात भारतीय जनता पक्षात कुठे खुशी तर कुठे गम बघायला मिळत आहे.
भारतीय जनता पार्टीची केंद्रासह राज्यात एकहाती सत्ता असून जिल्ह्यात चार आमदार भाजपचे आहेत. इतकेच नाही तर पालकमंत्रीही डॉ. पंकज भोयर हे पण सत्ताधारी पक्षाचेच असल्याने जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांनी आपला गड राखला, आर्वी सोडून बाकी ठिकाणी भाजपची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या वर्धा जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रात मोठ्या प्रचार सभा झाल्यात. त्यामुळे सहाही पालिकांवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येईल, असा अंदाज असतानाच या निकालातून भाजपला जोराचा धक्का आरामात बसला आहे. सहापैकी तीनच पालिकांवर भाजपला भगवा फडकावला आहे. दोन नगर पालिकांमध्ये काँग्रेस तर एका पालिकेत अपक्षाने नगराध्यक्षपद हिसकावून घेतले आहे.
वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व सिंदी (रेल्वे) या सहा नगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये दोन टप्प्यांत निवडणूक घेण्यात आल्याने काहींना फायदा तर काहींना धक्का सहन करावा लागला. अखेर काल रविवारी सकाळी 10 वाजता पासून निकालांची घोषणा सुरू झाली. दुपारी 1.00 वाजेपर्यंत सर्वच नगर पालिकांतील निकाल स्पष्ट झाला. यामध्ये भाजपला हिंगणघाट, आर्वी व सिंदी (रेल्वे) या तीन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. काँग्रेसने पुलगाव आणि वर्ध्यात नगराध्यक्षपद हिसकावून घेतले असून देवळी अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’ ठरला आहे. भाजपच्या वाटेला नगराध्यक्षपद कमी आले असले तरी नगरसेवकांचे मात्र शतक साजरे केले आहे.
पालकमंत्री ठरले प्लॉप आमदार कुणावर हिट.
वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांचा मतदार संघ असलेल्या वर्धा नगर पालिकावर काँग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे त्यांना जोरदार झटका बसला आहे. त्यात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांनी हिंगणघाट व सिंदी (रेल्वे) नगर पालिकेवर एकहाती सत्ता मिळवून दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पालकमंत्री पंकज भोयर आणि माजी खासदार रामदास तडस प्लॉप ठरले आणि आमदार समीर कुणावर हिट झाल्याची चर्चा रंगली आहे.

