मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील प्रभाग क्र. १७ अंतर्गत मारोती वॉर्ड क्र. २ येथील राधानंद अपार्टमेंट परिसरात सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर अपार्टमेंटच्या चेंबरमधून निघणारे सांडपाणी योग्य पाईपलाईनद्वारे थेट गटारात सोडले न जाता उघड्यावरून रस्त्यावर वाहत असून नंतर ते समोरील गटारात मिसळत आहे.
या सांडपाण्यामुळे परिसरातील रस्त्यावर कायमस्वरूपी घाण साचलेली दिसून येत आहे. विशेषतः पावसाळ्यात पाणी साचून तीव्र दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या मार्गावरून दररोज पादचारी, शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते.
परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिस्थितीमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
नगर परिषद आरोग्य विभागाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून संबंधित अपार्टमेंट व्यवस्थापनाला योग्य पाईपलाईन बसविण्याचे निर्देश द्यावेत तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

