आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दि. 30 माहे जानेवारी 2026 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमितचे अंत्योदय अन्न योजनेंतर्गत तसेच प्राधान्य कुटूंब योजनेंतर्गत अन्नधान्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार जानेवारी 2026 चे शिधावाटप परिमान जाहिर करण्यात आले आहे.
नियमित प्राधान्य गट योजनेच्या शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ, नियमित अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका धारकांना प्रति शिधापत्रिका 22 किलो गहू व 13 किलो तांदुळ मोफत दिले जाणार आहे. साखर फक्त अंत्योदय योजना प्रति शिधापत्रिका 1 किलो प्रमाणे 20 रुपये दराने वाटप करण्यात येईल, यासाठी जिल्ह्याला जानेवारी महिन्याच्या नियतनासाठी अंत्योदय अन्न योजनेच्या 50 हजार 884 शिधापत्रिका कार्ड धारकांसाठी प्रतिकार्ड गहु 22 किलो प्रमाणे 11 हजार 200 क्विंटल व तांदूळ 13 किलो प्रमाणे 6 हजार 660 क्विंटल प्राप्त झाले आहे.
तसेच प्राधान्य कुटूंब लाभार्थी सदस्य असलेल्या 9 लाख 81 हजार 64 लाभार्थी असलेल्या प्रति लाभार्थीसाठी गहू 3 किलो प्रमाणे 29 हजार 430 क्विंटल व तांदूळ प्रति लाभार्थी 2 किलो प्रमाणे 19 हजार 180 क्विंटल नियतन प्राप्त झाले आहे. अंत्योदय अन्न योजनेंतर्गत 50 हजार 884 कार्ड धारकांना प्रतिकार्ड 1 किलो प्रमाणे साखर उपलब्ध करुन देण्यासाठी 6 हजार 106 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बबिता आळंदे यांनी कळविले आहे.

