✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या पतीचे एका दुसऱ्या तरुणीसह अनैतिक संबंध असल्याच्या संशयातातून एका पत्नीने आपल्या बहिण आणि मैत्रिणीच्या साहाय्याने तरुणीची हत्या केली ही घटना कुर्ला येथून समोर आली आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी तिघी आरोपी महिलांना अटक केली आहे. मीनल पवार, शिल्पा आणि प्रज्ञा भालेराव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत.
कुर्ला कसाईवाडा परिसरातील एका नाल्यात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती बुधवारी नेहरू नगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने नाल्यातून मृतदेह बाहेर काढला. एका गोणीमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. पोलिसांनी तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी या परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाची तपासणी केली. यामध्ये एका रिक्षाबद्दल पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या रिक्षाचा शोध घेतला. रिक्षाचालकाने आरोपी महिलांना कामगार नगर येथून माहुल गाव परिसरात सोडल्याचे पोलिसांना सांगितले.
हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे आपल्या पतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने आरोपी मीनल पवार हिने या तरुणीचे हत्याकांड रचले. मीनलने मयत तरुणीला आपल्या पतीपासून दूर राहण्याबाबत अनेक वेळा समज दिली होती. मात्र मुलगी ही तरीही मीनलच्या पतीला भेटत होती. यामुळे मीनल मोठ्या प्रमाणात संताप झाला होता.
मीनल, तिची बहिण शिल्पा आणि मैत्रिण प्रज्ञा भालेराव या तिघीही बुधवारी दुपारी मुलीला भेटल्या. तिघींनीही तरुणीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीने त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तिघींनी तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तरुणीचा मृतदेह प्लॅस्टिक बॅगेत भरुन गटारात फेकून दिला. पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन गटारातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

