महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- शहरातील बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. हॉकर्स, अवैध रिक्षा थांबे, दुकानाबाहेर अगदी रस्त्यापर्यंत ठेवलेला माल यामुळे आधीच अरूंद असलेल्या या रस्त्यांची रुंदी आणखी कमी होत आहे.
परिणामी ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत असून, नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणे हटवून वाहतूककोंडीवर मार्ग काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, नगरपालिकेवर प्रशासन असल्याने सध्या रिकामे असलेले संगमनेर शहराचे सेवक शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्यापासून पळ काढताना दिसत आहेत.
शहरातील चौका-चौकात अतिक्रमणांनी हैदोस घातला आहे. नगरपालिकेचे प्रशासनही अतिक्रमणे हटविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. पारंपरिक भाजी बाजार वगळता शहरात नव्याने झालेले भाजीपाल्याचे, फळ विक्रीची दुकाने नगरपालिका बंद कधी करणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे. ज्या कारणासाठी संगमनेर बसस्थानकाचे नूतनीकरण केले, आजूबाजूच्या सर्व टपऱया हटवल्या, त्या ठिकाणी पुन्हा हातगाडय़ा, फळांची दुकाने थाटण्यात आली आहेत. मालदाड रोड, बी. एड. कॉलेज सर्कल, नवीन नगर रोड, सय्यद बाबा चौक, दिल्ली नाका परिसर, मेन रोड अशा विविध भागांमध्ये हातगाडय़ांचे अतिक्रमण पुन्हा वाढलेले आहे. बसस्थानक ते बीएड कॉलेज सर्कलपर्यंतचा रस्ता एकेकाळी रुंद होता. आज दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बेकायदेशीर रिक्षाथांबे निर्माण झाले आहेत.
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या माळीवाडा चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते थेट शारदा संस्थेच्या मालपाणी विद्यालय आणि एलआयसी कार्यालयापर्यंत दोन्ही बाजूंनी म्हाळुंगी नदीपर्यंत अतिक्रमण झाले आहे. शहरात या कुठेही हातगाडय़ा लावा, दुकाने थाटा व ठेकेदारांना पैसे द्या, असा उद्योग नगरपालिकेच्या प्रशासनाकडून चालू आहे. हे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी नगरपालिकेच्या प्रशासनाची असली तरी प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नाही. नगरपालिकेवर प्रशासक येऊन एक वर्ष झाले आहे. जनहिताचे आणि मूलभूत समस्या सोडवण्याचे कुठलेही काम या प्रशासकांनी केलेले नाही. सत्ताधारी आणि विरोधकांनादेखील अतिक्रमणे हटविणे जड जात आहे.

