✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट:- तालुक्यातील स्वस्त राशन धान्य गरीबांना कधी मिळेल हे सर्वांना पडलेले कोडे आहे. राशन दुकानदारांचे ऑनलाईन मशीनचे सर्व्हर मागील काही दिवसांपासून डाऊन असल्याने तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. दिवाळीच्या तोंडावर याचा फटका तालुक्यातील रेशन कार्ड धारकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याची वेळ ओढवली असून लाभार्थी दिवाळीमध्ये सरकार कडून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहिले आहे.
शासनाने सर्व रेशन कार्डाची नोंदणी पॉस मशीनमध्ये आरसी नंबर केली आहे. आधार क्रमांकानुसार नोंद करून घेतली आहे. या सर्व मशीन एका लहान अँटिनाद्वारे ऑनलाइन सर्व्हरने जोडल्या असतात. मागील चार-पाच दिवसांपासून तालुकाभरात सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटपाचे काम ठप्प आहे. धान्याचा कोटा सर्व दुकानदारांनी आणून ठेवला आहे. दररोज ग्राहक दुकानात चकरा घालून ,खाली हाताने परत जात आहेत. तालुक्यात सर्व्हरच डाऊन असल्यामुळे या रेशन दुकानांमधील मशीन शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. याबाबत तांत्रिक बिघाड हा संपूर्ण जिल्ह्यात असल्याचे बोलले जाते. शासनाने संपूर्ण धान्य वाटप ’ऑनलाइन’ केल्यामुळे धान्य दुकानदारांना ’ऑफलाइन’ धान्यवाटप करता येत नाही, हे येथे उल्लेखनीय. कोणत्याही जनप्रतिनिधीने याची दखल घेतली नसल्याने सामान्य जनतेमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.