महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक छोटा टेम्पो आणि दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील दोन तरुण जागीच ठार झाले. त्यामुळे संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली आहे.
टेम्पो आणि दुचाकी अपघाताची ही घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. ओम राहूल पेंडभाजे वय 19 वर्ष व शुभम सदाशिव टेकुडे वय 18 वर्ष दोघे रा. देवगिरीवस्ती, साकूर ता. संगमनेर असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
या बाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी पिंपळगाव देपा शिवारात छोटा टेम्पो हा साकूरकडे जात होता. यावेळी अमोल पेंडभाजे व शुभम सदाशिव टेकुडे हे दोन तरूण दुचाकीवरून संगमनेरकडे जात असताना या वाहनांचा अपघात झाला आणि त्यामध्ये दुचाकीवरतीअसणारे दोघेजण जागीच ठार झाले.
अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्या दोघाही तरुणाना जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी संगमनेर येथे नेण्यात आले. मात्र त्या दोघाचा उपचारा पुर्वीच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे, संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या दोन्ही तरुणांच्या अपघाती मृत्यूने झाल्याने साकूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून ऐन दिवाळीत या दोघा तरुणांच्या अपघाती मृत्यूने पठारभागावर शोककळा पसरली आहे.

