विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर: नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत 9 हजार 132 व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी अर्ज देखील दाखल केले आहेत. पदवीधर व्यक्तींनी मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत लिंकद्वारेच मतदार नोंदणीचा अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 1 नोव्हेंबर 2022 च्या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु झाला आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात 9 हजार 132 ऑफलाईन अर्ज दाखल झाले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 593 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. पाथर्डी तालुक्यात सर्वात कमी 134 जणांचे अर्ज दाखल झाले.
ऑफलाईनला म्हणावा असा प्रतिसाद मिळेना. कामधंदा सोडून खास मतदार नोंदणीसाठी तहसील कार्यालये गाठणे पदवीधर व्यक्तींना जड जात होते. मतदार नोंदणी अधिकाअधिक व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने आता ऑनलाईन नोंदणीचा निर्णय घेतला.
पदवीधर मतदार नाव नोंदणी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नमुना-18 भरून मंडळस्तरावर अथवा तहसील कार्यालयात येथे जमा करू शकतात. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिकृत लिंकद्वारे इच्छुक आपले मतदार नोंदणी अर्ज दाखल करू शकतात, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नमूद केले आहे.

