मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- जूने नाशिक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हनी ट्रॅप प्रकरणातील एका संशयित महिलेस मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात दोन संशयितांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी इम्रान इनामदार आणि त्याच्या तीन महिला साथीदार महिलांच्या मागावर नाशिक पोलिसांचे पथक आहे.
यापूर्वी नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने सोनू ऊर्फ बालेश नरहरी देशमुख आणि अविनाश विजेंद्र परदेशी यांना अटक केली आहे. नाशिकमध्ये घडलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात समोर आलेली माहिती धक्कादायक असून चर्चेचा विषय ठरत आहे. वाहन विक्रीचा व्यवसाय दाखवून कमी किमतीत वाहन विक्रीला अनेक नागरिक तयार व्हायचे नंतर काय व्हायचे हे समोर आल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहे.
नाशिकमध्ये महिलांना साथीदार बनवत काही व्यक्तींनी वाहन विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचा कट रचला होता. त्यात वाहनाची किंमत कमी असल्याने अनेक नागरिक खरेदी करण्यासाठी तयार होत असायचे, त्यानंतर त्यांना ट्रायलसाठी दूरवर घेऊन जायचे. यावेळी मात्र गुंगीचे औषध असलेले पाणी समोरच्या व्यक्तीला प्यायला द्यायचे, संबंधित व्यक्ती बेशुद्ध झाला की साथीदार असलेल्या मुली आणि महिलांसोबत छायाचित्र आणि चित्रफीत काढले जायचे. नंतर मात्र महिलांसोबत छायाचित्र आणि चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली जायची आणि त्यानंतर हजारो रुपये उकळले जायचे.
अशीच एक तक्रार इम्रान इनामदार या व्यक्तीच्या विरोधात नाशिकमधील एका व्यक्तीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, त्यावरून मध्यवर्ती गुन्हे शाखेने तपास करत मोठी कारवाई केली आहे.

