✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- जिल्हातील हिंगणा येथून एक मनहेलावणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. बायकोच्या त्रासाला कंटाळून नागपूर शहरातील सक्करदरा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अयोध्यानगर परिसरातील दुर्गा नगरातील एका पतीने मोहगाव (झिल्पी) तलावाजवळील भिवकुंड नाल्याजवळ पेट्रोलजन्य पदार्थ अंगावर टाकून जाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राहुल श्यामलाल बोरीकर वय 45 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.
राहुल बोरीकर यांचे दहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला त्याची बायको त्रास देत असल्यामुळे त्याने ही टोकाची भूमिका घेतली. असे त्याने लीहलेल्या सुसाईड नोट मधून समोर आले आहे. राहुल बुटीबोरी येथील निलकमल कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावाजवळील भिवकुंड नाला ‘लव्हर्स पॉईंट ” म्हणून ओळखला जातो. दिवसभर महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची झुंबड उडते. शनिवारी रात्री उशिरा गुराखी घराकडे परतत असताना नाल्याजवळ गुराख्यांना दुर्गंधी आली. यामुळे गुराख्याने जवळ जाऊन पाहिले असता जळालेला मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला. गुराख्याने घटनेची माहिती सरपंच प्रमोद डाखळे यांना दिली.
सरपंचाने हिंगणा पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक महाजन ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या केलेल्या व्यक्तीने अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून जाळून घेतल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्याची बॅग परिसरातील झाडाला लटकवलेली होती. या बॅगमध्ये ‘सुसाईड नोट’ आढळून आली. पत्नी वारंवार धमकी देत असल्याने त्रस्त झाल्याचे ‘सुसाईड नोट’मध्ये लिहून ठेवले आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली.
आई, दादांना कळवा
मरणानंतर या घटनेची माहिती आई-दादा व ताईंना देण्यात यावी, अशी विनंतीही चिठ्ठीत केली आहे. तिघांचे मोबाईल नंबरही त्यात लिहिले आहे. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

