मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
देवळाली कॅम्प:- दिवाळी सणानंतर बहिणीला सासरी सोडण्यासाठी आलेल्या भावाला जबर मारहाण करून त्याचा खून करुन फरार झालेल्या आरोपींना देवळाली पोलिसांनी काही तासातच अटक करुन बेड्या ठोकल्या आहे. चुलती व पुतण्या यांच्या नात्याला काळिमा फासणारे कारण या खूनातून समोर आले आहे.
सख्ख्या चुलतीला मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ व मेसेज पाठवित असल्याच्या कारणातून चुलत भावानेच मित्रांच्या मदतीने भावाचा खून केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलासह चौघांना बेड्या ठोकल्या आहे. गणेश पंजाब पठाडे वय २५, रा. हिंगोली असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुख्य आरोपी अमोल अंबादास पठाडे वय २८, रा. विहितगाव, नाशिक, अजय वाल्मिक लोंढे 23 ,रा. विहितगाव अरमान मेहरबान अली सैय्यद 20, रा. बजरंग वाडी अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रज्ञा सिद्धार्थ कांबळे वय 30, रा. भगूर, देवळाली कॅम्प व मयत गणेश पंजाब पठाडे वय २५, रा. हिंगोली हे दोघे भाऊ-बहीण आहेत. मयत गणेश हा प्रज्ञा कांबळे हिला सासरी सोडण्यासाठी आला होता. मंगळवारी दि.८ सकाळी 10.30 वाजेदरम्यान मोबाईल रिचार्ज करुन येतो, असे सांगत तो कॉलवर बोलता बोलता घराबाहेर गेला होता. परंतु,बराच वेळ होऊनही आपला भाऊ घरी आला नाही म्हणून त्यांनी शोधाशोध केली. सायंकाळी नागझीरा नाला येथे तो जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गणेशचा चुलत भाऊ आरोपी अमोल पठाडे याने मित्रांच्या मदतीने त्याला बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याचे बहिणीने म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अमोल पठाडे याच्यासह चार जणांना ताब्यात घेतले असून, यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गणेशला अमोलने विविध ठिकाणी नेत मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे . गणेशच्या पश्चात आई,वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अमोल पठाडे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

