सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- महानगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या अतिधोकादायक इमारतीवर चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने कारवाई करायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर शहरात असा 15 इमारती धोकादायक असून, यातील सात इमारतींवर महानगर पालिका प्रशासनाने बुलडोझर चालवत भुईसपाट केल्या आहेत, तर उर्वरित सर्व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घर सोडून त्वरित स्थलांतरित करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
चंद्रपूर महानगर पालिका हद्दीत अनेक जुन्या इमारती आहेत त्या पुरातन झाल्यामुळे त्या पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महानगर पालिका प्रशासनाने बापटनगर, नगिनाबाग, नागपूर रोड, गौतम नगर, रामाला तलावाजवळील एक व मीलन चौक येथील दोन इमारती अशा एकूण सात अतिधोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या धोरणानुसार शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे, अशा अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी देखील घुटकाळा वाॅर्ड येथील एकोरी प्रभाग क्र.10 येथील एक अतिधोकादायक इमारत कोसळून एक व्यक्ती जखमी तसेच वित्तहानीही झाली होती. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊन जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतींचा वापर थांबवून तात्काळ स्थलांतरित होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.

