वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील भर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या बॅनरची पोलिसांनी दखल घेतली आहे. काही लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील सारसबागजवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसकडून बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे काँगेस आणि सावरकर वाद आणखी वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भर चौकात सावरकर यांचे अशा प्रकारचे बॅनर लावल्याने परिसरातील सावरकर प्रेमिणी संताप व्यक्त केला आहे. त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे. महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटले आहे. राज्यातील अनेकांकडून राहूल गांधींच्या विधानाचा निषेध केला जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले आहे.
सावरकरांच्या पुतळ्याच्या समोर माफीवीर आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स लावले यावरुन भाजप आणि कॉंग्रेसमध्ये वाद निर्माण झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून युवक प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात 153, 504, 188 कलम अन्वये स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

