मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- सिटी सेंटर मॉलजवळ वाळूच्या डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडलेल्या वृद्धाच्या डोक्यावरूनच डंपरचे चाक गेले. या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला असून, त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी गंगापूर रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दिलीप हनुमंत भावे ७६, रा. कामटवाडा, नाशिक असे मृत वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप भावे व त्यांच्या पत्नी रश्मी भावे दुचाकीवरून एमएच- १५- एफपी- ३२३४ सिटी सेंटर मॉल सिग्नलकडून गंगापूर रोडच्या दिशेने निघाले. या वेळी सिग्नल ओलांडून सिटी सेंटर मॉलसमोर ते आले असता, पाठीमागून आलेल्या वाळूच्या डंपरने एमएच- १५- डीके- ४८४७भावे यांच्या दुचाकीला धडक दिली.
त्यामुळे भावे दांपत्य दुचाकीवरून रस्त्यावर पडले. या वेळी भावे डंपरच्या चाकाखाली सापडले आणि चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. तर रश्मी भावे याही गंभीररीत्या जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
भावे सैन्यातील निवृत्त असून, त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सिटी सेंटर मॉल रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूपाची होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतरीत्या वाहने उभी केले जात असल्याने या रोडवर सायंकाळी आणि वीकेंडला वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होते. याच कोंडीमुळे शनिवारी एका वृद्धाचा बळी घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाईची अंमलबजावणी होत नसल्यानेच या मार्गावर वाहतूक कोंडी होते.

