विशाल जाधव, सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन सातारा:- कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावरील वर्धनगड घाटात बुधवार, दि. ३० रोजी एक भीषण अपघात झाला. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या केबीनचा चक्काचूर झाला. त्यामध्ये ट्रक चालक संजय सुतार रा. वेळू, ता. कोरेगाव हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर १०८ रुग्णवाहिका पुसेगावहून अवघ्या वीस मिनिटांत तेथे पोहोचली. परंतु ट्रक चालक आतमध्येच अडकलेला दिसला. ऊसाच्या कांडक्या ट्रकच्या केबीनमध्ये घुसल्या होत्या. यामुळे चालक कुठे अडकला आहे, हे कोणाला दिसतही नव्हतंं. पोलिसांनी जेसीबी आणि क्रेन मागवून घेतली. परंतु ही दोन्ही वाहने येण्यास तासाचा अवधी होता. त्यामुळे मग रुग्णवाहिकेतील डाॅ. विकास शिंदे, रुग्णवाहिकेचे चालक वीरभद्र चव्हाण आणि १०८ चे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कदम यांनी चालकाला केबीनमध्येच सलाईन लावण्याचा निर्णय घेतला. परंतु ऊसाच्या कांड्यामुळे आतमध्ये जाता येत नव्हते. अशा परिस्थितीतही आतमध्ये हात घालून जखमी चालक संजय सुतार याला सलाईन लावले. त्याच्या पायातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे तो बेशुद्धही होण्याची शक्यता होती. कर्मचाऱ्यांनी अंत्यत समयसूचकतेने निर्णय घेऊन सलाईनमधून इंजेक्शन देण्यास सुरूवात केली. परिणामी चालक तब्बल तासभर शुद्धीवर राहण्यास मदत झाली.
डॉक्टरनी दाखवली समयसूचकता.
डाॅक्टरांनी थेट ऊसाच्या कांड्याला सलाईन लावून आतमध्ये कसाबसा हात घालून जखमी चालकाला तासभर सलाईन लावले. डॉक्टरनी दाखवलेल्या समयसूचते मुळे त्या चालकाचा अखेर जीव वाचला. तासाभरात क्रेन आल्यानंतर केबीनमधून ट्रक चालकाची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला ताडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू केल्यामुळे चालकाचा जीव वाचला. अशा प्रकारे जखमीचा जीव वाचविल्याने १०८रुग्ण वाहिकेच्या डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून काैतुक होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

