✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्गातील प्रत्येक विद्यार्थी उत्तमप्रकारे शिकण्यासाठी अध्ययन, अध्यापन प्रक्रिया कशी प्रभावी करता येईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. भविष्यवेधी शिक्षक कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात गुणवत्ता पूर्ण शिक्षणाकरीता सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रम आढावा व भविष्यवेध शिक्षणाबाबत जिल्हा परिषद येथे ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिका-यांसह, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक लिंबाजी सोनवने, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नितु गावंडे, अधिव्याख्याता मधुमती सांगळे, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.
हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुध्दिमत्तेच्या सिध्दांताचा वापर करुन प्रत्येक विद्यार्थ्यांतील विविध कौशल्य शिक्षकांनी ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देऊन तो शिकला पाहिजे, असे रोहन घुगे म्हणाले. डॉ. मंगेश घोगरे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध शैक्षणिक कामाबाबत उत्कृष्ट पध्दतीने सादरीकरण केले. तसेच निपुण भारत अंतर्गत इएलएन पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानची उद्दिष्ट प्रत्येक शाळेतील मुलांमधून कशी विकसित व्हावी व वर्गातील 100 टक्के मुले कशा पध्दतीने प्रगत व्हावी यासाठी भविष्यवेध शिक्षण याबाबत दूरदृष्य प्रणालीव्दारे तज्ञ निलेश घुगे यांनी सर्वांशी संवाद साधला. या बैठकीला गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.