युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
नागपूर:- सध्या नागपूर मध्ये सुरू असलेलं राज्याचे हिवाळी अधिवेशन तापलं आहे. त्यात नागपूर हे क्राईमची राजधानी होते की काय असं चित्र समोर येत आहे. विधानसभेच्या पहिल्या दिवसाला दुहेरी हत्याकांडाने या अधिवेशनाला सलामी दिली आहे. नागपूर हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांचा गृहजिल्हा पण आज या जिल्ह्यात क्राईमचा ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुहेरी हत्याकांड घडल्याने लोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडधामना परिसर दोन युवकाची हत्या करण्यात आली आहे. या दोघांचेही मृतदेह नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वडधामना येथील जनता दरबार ढाब्यासमोरील रस्ता दुभाजकावर पडून होते. योगेश ऊर्फ तारा मेश्राम वय 27 वर्ष, महेश ऊर्फ सलमान गजभिये वय 26 वर्ष रा. भिवसनखोरी,दाभा अशी मृतांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण…
जनता दरबार ढाब्यासमोरील रस्ता दुभाजकावर दोन युवकांचे मृतदेह असल्याची वार्ता सोमवारी सकाळच्या सुमारास पसरली. योगेश ऊर्फ तारा मेश्राम व मृतक महेश ऊर्फ सलमान गजभिये हे दोघेही दुचाकीने एमएच ३१, एफजे ०२१४ गोंडखैरीतून राष्ट्रीय महामार्गाने भिवसनखोरीकडे जाण्याकरिता निघाले होते. याचवेळी जनता दरबार ढाब्यासमोर कारने आरोपींनी त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेनंतर योगेश व महेश हे दोघेही गाडीवरून खाली पडले. कारमधून चार आरोपी उतरले व योगेश ऊर्फ तारा मेश्राम याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. आरोपी चार युवक असल्याने दोन्ही युवकांचे काहीच चालले नाही. योगेशच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचे डोके फुटले होते. तसेच पायावर मार लागल्याचे चित्र दिसून आले. मृत महेशच्या शरीरावर कुठेही घावाचे चिन्ह नसल्याचे लक्षात येत आहे. योगेश आणि महेश यांचा भिवसनखोरीत अवैध दारू विक्रीचा व्यवसाय होता. येथे ते अवैधरीत्या मोहाची दारू विक्री करायचे. त्याच कारणाने तो गोंडखेरीत मोहाची दारू घ्यायला गेला होता. घटनास्थळी मोहाची दारू पोलिसांना आढळली. योगेशच्या हातात मिरची पावडरचे पॅकेट मिळाले. या हत्याकांडात आरोपी म्हणून अब्बास नावाच्या संशयित आरोपीची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी, एसीपी यांनी वाडी पोलिस गाठले. वाडी पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेद करिता शासकीय रुग्णालयात पाठविले. घटना घडल्यानंतर सर्वप्रथम अपघात की हत्या, याबाबत तर्कवितर्क काढले जात असताना घटनास्थळाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात एका प्रत्यक्षदर्शिने घटना घडल्याचे पाहिले. व्हिडिओत चार जण कारमधून आले व या युवकांवर धारदार शस्त्राने सपासप वार करून गाडीत बसून पळाल्याचे सांगितले आहे. वाडी पोलिसांनी घटनेची नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348