✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:-
मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेत जास्तीत जास्त तरुणांनी मतदार नोंदणी करावे यासाठी तरुणांना प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. यासाठी विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील ठरलेली वर्ध्याची ॲड. शिवानी सुरकार हिची वर्धा जिल्हा ‘आयकॉन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी केली आहे. त्यासाठी शिवानीने प्रशासनाचे आभार मानलेत. प्रशासनाने दिलेली ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळणार असल्याचं सांगितलंय.
आगामी निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत 32 हजार नवीन मतदार नोंदणी करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर ते 5 डिसेंबरपर्यंत 6500 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. मतदार नोंदणीत जास्तीत जास्त तरुणांनी नोंदणी करण्यासाठी तरुणांना प्रेरीत करणाऱ्या व्यक्तीमत्वाची आवश्यकता होती. त्यानुसार “विदर्भाची पहिली तृतीयपंथी वकील” म्हणून नावलौकिक मिळविलेल्या अड. शिवानी सुरकार हिची ‘आयकॉन’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
शिवानी यांनी वर्धा येथून बी. कॉमचं शिक्षण घेतलं. त्यानंतर सेवाग्राम इथून एमबीए पूर्ण केलं. दिल्ली विद्यापीठाचा एनडीडी हा नॅचरोपॅथीचा अभ्यास क्रमही शिवानीने पूर्ण केला आहे. त्यानंतर तिने वर्ध्यातील यशवंत महाविद्यालयातून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं केलं. शिवानी देशात तिसरी, राज्यात दुसरी तर विदर्भात पहिली तृतीयपंथी वकील ठरलीय. चार पदव्या असलेली शिवानी आता तरुणांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करणार आहे.