✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.4:- गेल्या काही वर्षापासून विविध राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्वेक्षणामध्ये जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख हा सातत्याने कमी राहिलेली आहे. गुणवत्तेत मागे राहण्याच्या कारणांचा शोध घेण्यात आला आहे. त्यानुसार उपायोजना करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘दीपस्तंभ’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यासाठी केंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा पातळीवरून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये एकसंघता आणली जात आहे. फाऊंडेशन लर्निंग ॲन्ड न्युमेरसीची उद्दिष्टे निर्धारित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यासाठी नियमित अंतराने विद्यार्थ्यांच्या संपादणूकीची पडताळणी केली जातील. विद्यार्थी संपादणूकीची लहान लहान उद्दिष्टे ठेवून ती साध्य करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न केले जात आहे. सन २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये जिल्ह्याला राज्यातील पहिल्या ३ जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
दिपस्तंभ या उपक्रमाचे स्वरूप आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणांकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. या सर्व उपक्रमांमध्ये जिल्हास्तर एकसंघता राखली जाते. सर्व उपक्रम परस्परांना पूरक आहेत आणि सर्वांचा उद्देश गुणवत्ता विकास हाच आहे हे लक्षात ठेवून उपक्रमांची पुनरावृत्ती टाळली जात आहे. विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी तपासण्यासाठी दर १५ दिवसांनी महिन्याच्या १५ व ३० तारखेला इयत्ता १ ते ८ च्या सर्व शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची भाषा आणि गणित विषयाचा अध्ययन स्तर निश्चित केला जात आहे.
तालुका, केंद्र आणि शाळानिहाय आलेले निकाल दुसऱ्याच दिवशी सर्व शाळांना आणि तालुक्याला कळविले जातात. दर १५ दिवसाच्या तपासणी नुसार तालुका, केंद्र आणि शाळानिहाय क्रमांक काढले जातात आणि मिळालेल्या गुणांनुसार तालुका, केंद्र आणि शाळांना स्टार दिले जातात. प्रथम क्रमांकावर आलेल्या शाळेला व तेथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कॉफी विथ कलेक्टर, कॉफी विथ मुख्य कार्यकारी अधिकारी कॉफी विथ पोलिस अधीक्षक यासारखे विविध उपक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत.
पाठीमागे असलेल्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यवेक्षिय यंत्रणेचे अधिकारी भेट देतात आणि त्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली जाते. प्रत्येक तालुकानिहाय गुणवत्ता विकासाचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या कामाचा आढावा जिल्हा स्तरावरून डायट मार्फत घेतला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सहशालेय उपक्रमाच्या अंमलबजाव णीवर विशेष भर दिला जातो. आशयापेक्षा अध्ययन निष्पत्तीच्या साध्यतेवर भर दिला जात आहे. उपक्रमाचे अनुधावन घेण्यासाठी जिल्हा सुकानु समिती, जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्ष यांच्यामार्फत दर १५ दिवसांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, डाएट प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी स्वतः सर्व पर्यवेक्षिय यंत्रणेची बैठक घेवून उपक्रमाचा आढावा घेतात.
‘तिमिरातुनी तेजाकडे’ हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या उपक्रमाला शाळास्तर, पर्यवेक्षिय स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे. छोटी छोटी उद्दिष्टे साध्य होत असल्याने शाळांना यशाचा आनंद मिळत आहे. सर्व तालुके, केंद्र आणि शाळा यांच्यामध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली असल्याने उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.