पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका शाळेसमोर शटरचे काम करणाऱ्या एका 26 वर्षीय तरूणाने 17 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. ही घटना समोर येताच पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप दिसून येत आहे. शाळा व्यवस्थापनाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी नंदनवन स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीला अटक केली. रवी प्रकाश लाखे वय 26 वर्ष, रा. गंगाविहार कॉलनी, नंदनवन नागपूर असे बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी रवी हा शटर बनविण्याचे काम करतो. नंदनवन परिसरातील एका खासगी शाळेसमोर स्टेश्नरी आणि डेली निड्सचे दुकान आहे. दररोज दुपारी शाळेच्या विद्यार्थिनी या दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी येत असल्याने गर्दी असते. गेल्या मंगळवारी दुकान मालकाने रवीला शटर दुरूस्त करण्यासाठी बोलावले होते. दरम्यान, शाळेच्या विद्यार्थिनी दुकानात चॉकलेट आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आल्या. गर्दी असल्याने रवी सुद्धा वस्तू देण्यात दुकान मालकाची मदत करू लागला. या दरम्यान त्याने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले. काही विद्यार्थिनींना त्याने पैसे न घेताच चॉकलेट दिले आणि आक्षेपार्हरित्या स्पर्श करू लागला.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी नोंदवली तक्रार: शुक्रवारी शाळेच्या मुख्याध्यापकांनी नंदनवन पोलिस स्टेशन मध्ये आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नंदनवन पोलिसांनी आरोपी रवी विरुद्ध विनयभंग आणि पोक्सो ॲक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. दुकान मालकाकडून त्याच्याबद्दल माहिती घेत त्याला अटक करण्यात आली.
विद्यार्थिनींनी दिली परिवाराला माहिती: मागील दोन दिवसांपूर्वी 2 विद्यार्थिनींनी आरोपी रवी याचा या कुकृत्याबाबत परिवाराला माहिती दिली. या दोन्ही विद्यार्थिनीचे पालक शाळेत पोहोचले आणि मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून इतर विद्यार्थिनींची विचारपूस करण्यात आली. एकूण 17 विद्यार्थिनींनी रवीने अश्लील चाळे केल्याची माहिती दिली.

