आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- 1 नोव्हेंबर 2023 रोजी स्वयंपाक करण्याच्या वादातून सासू आणि नणंदेने आपल्या सुनेला शिवीगाळ करत अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणारी घटना घडली होती या घटनेने संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती या महत्वपूर्ण घटनेचा पुणे सत्र न्यायालयात खटला सुरू होता या न्यायालयाने निकाल पारित करत सुनेची हत्या करणाऱ्या आरोपी सासू आणि नणंदेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हत्या करण्यात आलेल्या मयत विवाहिता दीपाली अमित चव्हाण वय 28 वर्ष हिने मूत्यूपूर्व पोलिसांना जबाब दिला होता त्या आधारे आणि साक्ष पुरावे ग्राह्य धरुन पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रभाकर जाधव यांनी आरोपी सासू आणि नणंदेला दोषी ठरविले. ममता विजय चव्हाण वय 48 वर्ष, रा. श्रमिकनगर, मंगळवार पेठ आणि रिटा उर्फ गौरी संतोष वाल्मिके वय 34 वर्ष, रा. जय जवान नगर अशी शिक्षा ठोकावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वयंपाक करण्यावरून झालेल्या वादातून आरोपी सासू ममता व नणंद रिटा यांनी दीपाली हिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. यात मृतक दीपाली गंभीर भाजली होती. त्यानंतर दीपाली हिला पती अमितने ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी ससून रुग्णालयात फरासखाना पोलीस स्टेशन मधील सहायक निरीक्षक परशुराम शिंदे यांनी तिचा वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत जबाब नोंदवून घेतला होता. उपचारादरम्यान दीपालीचा 3 नोव्हेंबर 2023 रोजी ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.
दीपालीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन हत्या केल्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी ममता विजय चव्हाण आणि रिटा उर्फ गौरी संतोष वाल्मिके या दोघीं विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या खटल्यात सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाकडून 8 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष, तसेच मृत्यपूर्व जबाब ग्राह्य धरुन आरोपी सासू आणि नणंदेला जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रभाकर जाधव यांनी सुनावली आहे.

