राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवर एका तरुणाने उडी मारुन धोकादायक प्रकारे आंदोलन केलं आहे. साधारण अर्धा तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे मंत्रालयात आलेल्या अभ्यागतांनी एकच गर्दी केली होती. या तरुणाने जाळीवर नेमकी उडी का मारली? याचं कारण अघ्याप पर्यंत समोर आलं नाही.
मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवर एका तरुणाने उडी मारुन आंदोलन करत असल्याची माहिती मिळताच दोन पोलिसांनी तारेवरची कसरत करत जाळीवरच्या तरुणाला सुरक्षित काढलं आहे. साधारण तीस मिनिटे हा प्रकार सुरु होता. या तरुणाच्या काही मागण्या होत्या का? किंवा कुठल्या कारणाने त्याने जाळीवर उडी घेतली, याचा तपास पोलिस करीत आहेत.
यापूर्वी देखील मुंबई येथील मंत्रालयात सुरक्षासाठी लावण्यात आलेल्या जाळीवर आंदोलनं झालेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तवर मंत्रालयातल्या मुख्य इमारतीच्या आतल्या भागामध्ये जाळी बसवण्यात आलेली आहे. मात्र काही लोक जाळीवर चढून आंदोलन करतात. यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडते.
मंगळवारी 4.00 वाजण्याच्या सुमारास या तरुणाने मंत्रालयातल्या जाळीवर अचानक उडी घेतली. त्यानंतर अनेक लोक गॅलरीच्या दिशेने धावले. नेमकं काय घडलं, हे सुरुवातीला कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. त्यानंतर या तरुणाने आंदोलन केल्याचं लक्षात आलं. मंत्रालयात कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांनी तातडीने जाळीवर चढून आंदोलकाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु केले. एकतर जाळीवर उभं राहणं शक्य नाही. त्यात आंदोलकाला ताब्यात घेणं अशक्य गोष्ट होती. तरीही पोलिसांनी कसरत करीत आंदोलन करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं.