लेखक: प्रा. विकास डोईफोडे राह. सावनेर
लेख संकलन अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राष्ट्रीय विज्ञान दिवस विशेष लेख :- आपण आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचं स्वातंत्र्यपूर्व काळात अर्थात २८ फेब्रुवारी १९२८ ला “रमण इफेक्ट” हे संशोधन प्रकाशित झाले आणि या संशोधनाची दखल म्हणून त्यांना पदार्थ विज्ञानाचा जागतिक नोबेल पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे डॉ. रमण यांचे नामांकन प्रसिद्ध वैज्ञानिक लॉर्ड रुदरफोर्ड यांनी केले होते. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानास्पद बाब होती आणि राहणार.
१९८६ ला नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉम्मुनिकेशन यांनी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासंदर्भात सरकारकडे शिफारस केली. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, विज्ञानात रुची निर्माण व्हावी, प्रोत्साहन मिळावे या हेतूने आपण सर्व १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. विशेष बाब म्हणजे जागतिक विज्ञान दिन, १० नोव्हेंबर युनेस्को ने २००१ मध्ये जाहीर केला. पुढे हरगोविंद खोराणा (१९६८), सुब्रमण्यन चंद्रशेखर (१९८३) आणि वेंकटरामण रामकृष्णन (२००९) या भारतीय मूळ असलेल्या वैज्ञानिकांना अनुक्रमे मेडिसिन, फिजिक्स आणि केमेस्ट्री मध्ये नोबेल मिळाले. यांच्या संशोधनाला पूरक वातावरण कुठे मिळाले? हा समजून घेण्याचा विषय आहे. याशिवाय अनेक भारतीय वैज्ञानिकांचे बहुमूल्य योगदान आजच्या दिनी नाकारता येत नाही, विसरून चालणार नाही. यापैकी काही म्हणजे सतयेंद्रनाथ बोस, होमी जहांगीर भाभा, श्रीनिवास रामानुजन, विक्रम साराभाई, मेघनाथ सहा, प्रफुल्लचंद्र रे, जगदीशचंद्र बोस, बिरबल साहनी, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, शांतीस्वरूप भटनागर, जे. आर. डी. टाटा, विजय भटकर, असिमा चॅटर्जी, जानकी अम्माल, ऐ. पी. जे. अब्दुल कलाम, सी. एन. राव, सलीम अली, एम. एस. स्वामिनाथन, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, राज रेड्डी, टेस्सी थॉमस, कल्पना चावला, सुनीता विलीयम्स आणि याशिवाय अनेकांनी, संशोधन संस्थांनी देशाचे नाव विज्ञान पटलावर उज्वल केले.
अवकाश-दुरसंचार, अन्नधान्यातील स्वयंपुर्णता तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती आपण या सर्वांच्या योगदानमुळेच गाठू शकलो. तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांनी १९५८ मध्ये वैज्ञानिक धोरण ठराव मंजूर करून घेतला तर अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा जय जवान जय किसान मध्ये जय विज्ञान जोडून अनेकांना प्रेरित केले. राज्यघटनेच्या १९७६ च्या चाळीसाव्या दुरुस्तीमध्ये, कलम ५१ अ (ह) मूलभूत कर्तव्यंतर्गत जोडण्यात आले होते ज्यामध्ये असे नमूद आहे की, वैज्ञानिक स्वभाव, मानवतावाद, चौकशी आणि सुधारणेची भावना विकसित करने हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल. अशाच राजकीय इच्छाशक्तीची सदैव गरज राहील.
विज्ञान आणि औद्योगिक क्रांतिपूर्वी सुद्धा आपल्या येथे विज्ञान, आरोग्य चिकित्सा, गणित, धातूशास्त्र, तत्वज्ञान व खगोलशास्त्रात विशेष प्रगती झाल्याचे तसेच पारंगत असल्याचे दिसून येते. त्यासाठी आपल्याला चरक, आर्यभट्ट, आचार्य कनाद, वरहमिहीर, सुश्रुत, भास्कराचार्य यांच्या योगदानाकडे बघावे लागेल. दरम्यान या भूमीवर अनेक भौगोलिक आणि धार्मिक आक्रमणे झालीत. वैज्ञानिक भावनेला तडे गेले परंतु विज्ञान हे निरीक्षण, प्रात्यक्षिक, विश्लेषण, पुरावे यावर आधारित असल्याने ते कालाबाधित सत्यच राहणार. विज्ञान अवगत करण्यासाठी आत्मशुद्धी, आत्मबल, आत्मविश्वास, एकाग्रता अशा गुणधर्माची आवश्यकता असते आणि हे आपल्या अध्यात्मातून मिळण्याची शक्यता आहे, अंधश्रद्धेतून नव्हे! आपल्या अनेक अध्यात्मिक विधिंना विज्ञानाचा आधार आहे. धर्माच्या मार्गाने गेल्यास देवाकडे काही मागावे लागते परंतु शुद्ध कर्माच्या मार्गाने देव स्वतः देतो, ही उक्ती उगीच नव्हे!
आजचे विज्ञान हे उद्याचे तंत्रज्ञान बनते. आपण तंत्रज्ञानाचे फळे चाखतो पण मूळ वैज्ञानिक सिद्धांत, प्रक्रियेला कमी महत्व देतो. त्यामुळे देशात बेसिक सायन्स वर भर दिल्या गेला पाहिजे. जगात अनेक विनाउद्देश, अनपेक्षित आणि अपघाती शोध (सेरेंडिपीटी) लावल्या गेले. उदाहरणार्थ पेनीसिलीन, गुरुत्वाकर्षण, क्ष -किरण, मायक्रोवेव, टेफलोन आणि बरेच काही. या शोधांची पार्श्वभूमी संशोधकाचा दृष्टिकोन हे अभ्यासक्रमाचा भाग असणे फार गरजेचे वाटते. संशोधनाला, कल्पनेला बंदिस्त न ठेवता आर्थिक व सामाजिक प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. एच. एम. टी आणि इतर तांदळाचा शोध लावणाऱ्या दादाजी खोब्रागडे सारखे अनेक प्रयोगशील शेतकरी असतील त्यांना सहकार्याची नितांत गरज आहे अन्यथा अशा प्रतिभा कोमेजून नष्ट होतील. वर्ष २०२५ विज्ञान दिनाची संकल्पना, विषय “विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करने” अशी आहे. या निमित्ताने देशाला विचार करण्याची संधी आहे की युवकांना आपण कुठल्या दिशेने प्रोत्साहन देतो?, कुठले उपक्रम देशपातळीवर राबवितो? वंचितांच्या समान संधी योजनेचे काय होते? उच्चशिक्षण आणि विज्ञानसाठी सरकारचे प्रयत्न, बजेट पुरेसे आहे का? देशातील संशोधनाचा नागरिकांना किती फायदा होतो?
भविष्यात सर्व जगाला हवामान बदलाचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहे हे उघड आहे भाकीत नव्हे. शाश्वत विकासाचे सतरा उद्दिष्टे संयुक्त राष्ट्राने घोषित केले. ते पाळल्या गेले नाही तर नाजिकच्या काळात पृथ्वीवर मानवाचे जीवन असह्य होणार असा वैज्ञानिक इशाराही दिल्या गेला आहे. यासाठी प्रत्येक देश विज्ञा्नाचा सकारात्मक उपयोग करेल काय? हेच महत्वाचे आहे!

