श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड/मुंबई:- मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात आरोपी वाल्मीक कराड यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. त्यात आरोपी कराड बरोबर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून पक्षातील नेते आणि विरोधक आक्रमक झाले आहे. मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या 90 दिवसापासून सुरु असलेल्या आरोपांनंतर मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी क्रूर हत्या करण्यात आली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांच्यासह इतरांचा सहभाग स्पष्ट झाला.
या सर्व आरोपीवर हत्या, खंडणी आणि ऍट्रॉसिटी चे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने सत्ताधारी आमदार सुरेश धस, विरोधी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी लावून धरली होती.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु झाली आणि अखेर नव्वद दिवसांनी अर्थसांकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुंडे यांनी आपला राजीनामा दिला.
संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपीनी काढलेले फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर जनआक्रोश वाढल्याचे दिसून आले. त्यामुळेच मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे

