आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- विहिरीच्या मंजुरीसाठी चक्क नोटांचे बंडल घेऊन शेतकरी आज १४ रोजी पंचायत समिती कार्यालयात पोहोचले. यावेळी शेतकर्यांना विहिरीच्या मंजुरीकरिता पैशाची मागणी करणार्यांचा निषेध नोंदविण्यात आला. या अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे किरण ठाकरे यांनी केले.
देवळी पंचायत समितीच्या नरेगा विभागाचे कर्मचारी शेतकर्यांना विहिरीच्या मंजुरीकरिता पैशांची मागणी करीत असल्याची ओरड आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी अर्ज करूनही पैसे दिल्या शिवाय शेतकर्यांची विहीर मंजूर होत नाही. त्यामुळे तालुयातील संतप्त शेतकर्यांनी आज बुधवारी एकत्र येत नोटांचे बंडल घेऊन थेट देवळी पंचायत समितीचे कार्यालय गाठले. लाचखोर वृत्ती मुळीच खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. पैशांचे बंडल घेऊन गटविकास अधिकार्यांच्या दालनात पोहोचलेल्या आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी विहीर तातडीने मंजूर करण्याची मागणी रेटली. शिवाय सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले. पैशाची मागणी करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे व प्रलंबित विहिरी तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनाची माहिती मिळताच ठाणेदार अश्विन गजभिये यांनी पंचायत समिती कार्यालय गाठले. आंदोलनात शेतकरी मनोज नागपुरे, प्रवीण कात्रे, संदीप दिघीकर, स्वप्नील मदनकर, गौतम पोपटकर, अमोल भोयर, विनय महाजन, गौरव खोपाळ, मंगेश वानखेडे आदी सहभागी झाले होते.

