श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई तालुक्यातील गढी पुलावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गढी येथील कारखान्यासमोर दीपक आतकरे यांच्या मुलाचा एक्स यू व्ही ५०० वाहन डिव्हायडरवर आदळून अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी दीपक आतकरे आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी आले असता, अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली.या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच घटनास्थळी गेवराई पोलिस दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघाताच्या ठिकाणी अजून एक दुय्यम अपघातही घडला असून त्यातही एकजण जखमी झाला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी या मार्गावर वाहतुकीदरम्यान अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

