अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १५:- खापा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खापा शहरात, जुन्या वैमनस्यातून एका तरुणाने त्याच्या प्रतिस्पर्धी तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली. मृत चेतन अशोक गागटे वय २८ वर्ष हा हनुमान घाट खापा येथील रहिवासी आहे आणि आरोपी अर्जुन शेषराव नीडे वय २८ वर्ष हा खापा येथील रहिवासी आहे. ही घटना रविवारी, १५ जून रोजी सकाळी ११ वाजता बाजार चौकात घडली.
हत्या केल्यानंतर, आरोपी अर्जुनने खापा पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिस ठाण्याचे प्रभारी विशाल गिरी त्याच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत चेतनच्या कुटुंबीयांनी चेतनला उपचारासाठी मॅक्स हॉस्पिटल नागपूर येथे नेले. तिथे डॉक्टरांनी चेतनला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठला.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन आणि अर्जुनमध्ये अनेक वर्षांपासून वैमनस्य होते. यामुळे चेतनने वर्षभरापूर्वी मंडई च्या जत्रेत अर्जुनवर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. ज्यामध्ये अर्जुन गंभीर जखमी झाला होता, ज्यामध्ये पोलिसांनी चेतनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कालांतराने दोघांमधील वैर वाढत गेले. घटनेच्या दिवशी चेतन डॉक्टर बन्सी तुमाने यांच्या क्लिनिकच्या गल्लीतून जात होता. त्यानंतर अर्जुन हातात पिस्तूल (मौऊजर) घेऊन तिथे पोहोचला. चेतनला पाहताच अर्जुनने त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. चेतन जमिनीवर पडला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि जमिनीवर पडलेले पिस्तूल आणि तीन रिकामे काडतुसे जप्त केली.नागपूर जिल्हा ग्रामीण अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमल आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर अनिल म्हस्के यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पुढील तपास सुरू केला आहे.

