सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या-नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीतील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अतीधाडस करून नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा उमा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथे घडली.
टेकरी येथील दहावीत शिकणारे 13 जण फुटबॉल मॅच झाल्यावर उमा नदीत पोहायला गेले होते. मात्र, नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोन जण नदीत बुडले. आयुष गोपाले वय 16 वर्ष आणि जीत वाकळे वय 17 वर्ष अशी मृताची नावे आहेत. दोन्ही मृतक सिंदेवाही शहरातील रहिवासी आहे.
या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, मृतकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेने वाकडे आणि गोपाले कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे, घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत

