मधुकर गोंगले उपसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक मोठी बातमी समोर येत आहे. चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील सामकी माता विद्या विकास मंडळाद्वारे संचालित स्व. सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा व स्व. सुधाकर नाईक वि. जा. भ.ज. कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव – अनंतपूर शाळेतील जवळपास ४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.विद्यार्थ्यांना अचानक विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आश्रम शाळेतील या सर्व विद्यार्थांना अन्न व पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील स्व. सूरजमल चव्हाण आश्रमशाळा व स्व. सुधाकर नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच वसंतराव नाईक आश्रमशाळा या तिन्ही शाळेतील पहिली ते बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना त्रास झाला.
सोमवारी सायंकाळच्या दरम्यान विद्यार्थांना अचानक ताप, मळमळ, चक्कर, उलटी, सर्दी, खोकला असे लक्षण दिसून येत होते. त्यानंतर 16 विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या आमगाव महाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 7 विद्यार्थ्यांना रात्री 9.30 वाजताच्या सुमारास चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही विद्यार्थांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

