चिमुरचा छोकरा आशीष बोबडे आणि सप्पुदादा स्वप्नील वाग्दरकर यांची उपस्थिती. श्रीराम बालक आखाडा, बल्लारपूर प्रथम तर शिवशाही दहीहंडी पथक राजुरा मुलींचे पथक द्वितीय.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:– श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शनिवारी राजुरा शहरात पारंपरिक दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जुन्या बसस्टॉप परिसरातील भारत लॉज जवळ संध्याकाळी ७.३० वाजता रंगलेल्या या सोहळ्याने शहरात भक्ती, आनंद आणि युवाशक्तीचा महासागर उसळवला.
या भव्य सोहळ्याचे आयोजन शिवमंदिर सोनिया नगर व शिवाज्ञा वाद्य पथक यांच्या वतीने करण्यात आले होते.
या उत्सवाचे प्रमुख संयोजक राजुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे होते. त्यांनी स्वतः उपस्थित राहून तरुणांच्या उत्साहाला ऊर्जा दिली. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले की, दरवर्षी राजुरा येथे विविध सांस्कृतिक तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन आपण आणि आपल्या पक्षसंघटनेच्या वतीने करण्यात येते त्याच प्रमाणे आता दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचे सुद्धा नियमित आणि भव्य आयोजन करण्यात येईल. राजुरा आणि परिसरातील जनतेने, युवाशक्तीने असेच सहकार्य करून हा सांस्कृतिक सलोखा दिवसेंदिवस असाच वृद्धिंगत करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विशेष पाहुणे म्हणून चिमुरचा छोकरा आशीष बोबडे आणि सप्पुदादा स्वप्नील वाग्दरकर यांची उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. वाद्य पथकाचे सूर, “गोविंदा रे गोपाळा”चे गजर आणि उत्साही युवकांची हंडी फोडण्याची धडपड यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी आयोजकांनी आकर्षक बक्षिसे ठेवली होती. त्यात सर्वाधिक थर रचून प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह श्रीराम बालक आखाडा, बल्लारपूर या मुलांच्या पथकाने पटकाविले, द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह शिवशाही दहीहंडी पथक राजुरा या मुलींच्या पथकाने पटकाविले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी पंचायत समिती सभापती कुंदाताई जेणेकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी नगरसेवक हरजीतसिंग संधू, रवी त्रिशूलवार, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका संध्याताई चांदेकर, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे यांच्यासह कामगार काँग्रेसचे सुरजभाऊ ठाकरे, जिल्हा महासचिव एजाज अहमद, विनोद गेडाम, मतीन कुरेशी, निरंजन मंडल, सय्यद साबिर, संगीता मामीडवार, पुणम गिरसावळे, इंदूबाई निकोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उत्सव यशस्वी करण्यासाठी रवींद्र (आरपी) आत्राम, पियुष मामीडवार, अश्विनदादा बावनकर, आकाश यादव, अभिजीत दुर्गे, अमोल ढोले, सुमेध जगताप, यश गौरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र आत्राम यांनी केले. संचालन अंकुश चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन पियुष मामीडवार यांनी मानले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष अनुभवला आणि राजुरा शहरात दहीहंडी उत्सव अविस्मरणीय ठरला.

