पारंपरिक सणाबद्दल असलेले प्रेम सिंदी रेल्वेच्या पोळ्यात दिसून येते: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पोळा सणाला राज्याच्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. सिंदी (रेल्वे) येथील तान्ह्या पोळ्याला फार जुनी परंपरा आहे. पोळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील लोक सुद्धा पोळा बघण्यासाठी येथे येतात. दरवर्षी मोठ्या उत्साहात सिंदी (रेल्वे) येथे तान्हा पोळा आयोजित केला जातो यातून पारंपरिक सणाबद्दल असलेले प्रेम दिसून येते, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. नगर परिषद सिंदी (रेल्वे) च्यावतीने तान्ह्या पोळ्याचा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अमर काळे, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, माजी आमदार राजू तिमांडे, संजय गाते, अतुल वांदिले, तहसीलदार मलिक विराणी, कपिल हाटकर, मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, जागतिक दर्जाच्या पोळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या कार्यक्रमासाठी ही जागा अपुरी पडत असून सर्वांनी एकत्र येऊन पर्यायी मोठी जागा बघावी. मोठी जागा उपलब्ध झाल्यास अधिक उत्साहात पोळा साजरा करू. सिंदीच्या विकासासाठी राज्य शासन नेहमीच आपल्या पाठीशी उभी आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
खासदार अमर काळे यावेळी म्हणाले खासदार झाल्यानंतर दुसऱ्यांदा या पोळा उत्सवासाठी आलो. सिंदीच्या पोळ्याची परंपरा फार जुनी आहे. या परंपरेला राजश्रय मिळाल्यास अधिक चांगल्या पद्धतीने पोळा साजरा करता येईल, असे ते म्हणाले.
यावेळी आमदार समीर कुणावार म्हणाले, जागतिक दर्जाचा पोळा सिंदी (रेल्वे) येथे भरतो. पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा अजून वाढली पाहिजे. प्रत्येकाने शिस्तीचे पालन केले पाहिजे. 2005 पासून दरवर्षी सिंदीच्या पोळा उत्सवात मी सहभागी होतो. दरवर्षी नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. सिंदीचे वैभव कसे वाढेल हा आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे, असे ते म्हणाले.
पोळा उत्सवात आकर्षक झ्याक्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभक्ती, नशामुक्ती यांसारख्या सामाजिक संदेश देणाऱ्या झ्याक्या विशेष आकर्षणाचा विषय ठरल्या. तान्ह्या पोळा बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.

