महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मोरेगावचा मयूरेश्वर गणपती:- आज घराघरात आपला लाडका गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाने चैतन्यमय वातावरण आहे. आरत्या, भजनं गायली जात आहे. अशा या लाडक्या बाप्पाचे महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत परंतु अष्टविनायक हे राज्यात गणपतीचे प्रमुख आणि मुख्य मंदिरे असून त्याचा पहिला मान मोरगाव येथील मयूरेश्वर गणपती यांना दिला जातो. आज महाराष्ट्र संदेश न्युज सह जाणून घेऊया मोरेश्वर गणपती यांचा महिमा.

पुणे पासून 64 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगाव येथून मोरेश्वर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकां पैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. मयुरेश्वर मंदिर, मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, आदिलशाही कालखंडात या मंदिराचे बांधकाम केले आहे.
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधण्यात आले असून गावाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदी सारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस रिद्धि – सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर विराजमान आहेत.

आख्यायिका
असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, सिंधूने इंद्र आदि देवांवर आक्रमण केले. त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याचठिकाणी सिंधूचे मुंडके पडले. यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.
या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.
सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

