2 ऑक्टोबरला सावनेर येथे अभूतपूर्व दसरा मेळावा संपन्न.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- विकासाच्या राजकारणासाठी व समाजाच्या भल्यासाठी विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेरदेखील संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज बनणार, अशी गर्जना सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी सावनेर येथे आयोजित अभूतपूर्व दसरा मेळाव्यात नतमस्तक होऊन केली.
विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महात्मा गांधी जयंती व आरएसएस स्थापना शताब्दी निमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी, महाराष्ट्रद्वारे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवार दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी नगर परिषद ग्राउंड सावनेर येथे भव्य दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील घडामोडी, नागपूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा, सावनेर नवनिर्माण, सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचा विकास, आगामी निवडणुका अशा अनेक विषयांवर आमदार डॉ. आशिष देशमुख आपले प्रखर विचार व्यक्त केले.
आपल्या दमदार भाषणात ते म्हणाले, “विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महात्मा गांधी जयंती व आरएसएसच्या स्थापनेची शताब्दी या चारही विश्वव्यापी कार्यक्रमांचा आज सुरेख संयोग जूळून आला आहे आणि म्हणूनच सर्व समाजाला आपल्या राष्ट्राच्या तिरंगा झेंड्याखाली आणण्याचं काम आपण इथे सावनेरला करतो आहे. विदर्भातला सर्वात उंच तिरंगा सावनेर येथील गांधी चौकात उभारल्या जातो आहे. याच दिवासाला प्रभू श्रीरामाने अहंकाररूपी रावणाचा वध करून सितामातेला मुक्त केले होते. तसेच देवी दुर्गाने महिषासुराचा वध करून कित्येक पिडितांना मुक्त केले होते. यापासून स्फूर्ती आणि शक्ती घेत मी आशिष देशमुख तुमची अविरत सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. “स्वच्छ गाव, समृद्ध गाव” या गांधीजींच्या स्वप्नपूर्तीसाठी मला तुम्हा सगळयांची साथ हवी आहे. तुम्हां सर्वांना माहित आहे की, यापूर्वीचे सत्ताधारी कित्येक वर्षे तुमच्यासोबत जमीनदार म्हणून वागत होते. परंतू तुमचा आशिष तुम्हां सर्वांचा सालदार म्हणून काम करेल व सदैव तुमचा सालदार म्हणून वागेल. मी लोकप्रतिनिधी आहे, सत्ताधारी नव्हे.मी तुमचा सेवक आहे, मालक नव्हे. इमाने इतबारे, प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने, आदराने आपली अविरत सेवा करेल, अशी या शुभदिनी आपणा सर्वांना मी ग्वाही देतो, नतमस्तक होऊन वचन देतो.”
ते पुढे म्हणाले, “आपण सर्वजण बहुतांश इथे ओबीसी समाजाचे आहोत आणि आपल्याला गर्व आहे की, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान हे देखील ओबीसी समाजातून येतात. त्यांच्या नेतृत्वामध्ये मागील १० वर्षांमध्ये देशाने यशाचं शिखर गाठलं आहे. त्यांनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. लवकरच ओबीसीची जातीय जनगणना चालू होणार आहे. मोदींनी ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला वठणीवर आणले. आपल्या देशातच शस्त्र निर्मिती करून संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचं धोरण त्यांनी आखलं आहे. त्याच अनुषंगाने, ६ हजार हेक्टर जमिनीवर सावनेर एमआयडीसी येथे रक्षा कॉरीडॉर (डीएनए) प्रस्तावित आहे. सावनेर परिसरात १० हजार कोटींचा खत प्रकल्प एमआयडीसी सावनेर येथे उभारीत आहोत, यामुळे ३१ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
७० हजार कोटी गुंतवणुकीचा कोळसा वायुकरण (गॅसिफिकेशन) प्रकल्प उभारीत आहोत, त्यामध्ये ३५ हजार रोजगार निर्मिती मिळेल. २५०० कोटींचा सावनेर – छिंदवाडा फोर लेन रोड, १८०० कोटींचा कन्हान नदी डायव्हर्शन सिंचन प्रकल्प ज्यामुळे १२०० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार, सावनेर येथील पाच मजली नविन न्यायालय भवन निर्माण करण्याकरिता ४४ कोटींची मंजूरी, सेतू बंधन योजनेअंतर्गत कळमेश्वर रेल्वे गेटवरील उड्डाणपूल (R.O.B.) निर्मितीकरिता ५५ कोटी आणले तसेच सावनेर व कळमेश्वर क्षेत्राचं सौंदर्य वाढविण्यासाठी ७५ कोटी रूपये मुख्य रस्त्यांसाठी आणले. नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर बँक नफ्यात असून सुरळीत सुरू झालेली आहे आणि याचा सर्वांना फायदाच होत आहे. आपण खापरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस आयुक्त नागपूर शहरामध्ये वर्गीकरण केले, मोहपा येथे नविन पोलीस स्टेशनची निर्मीती केली, सावनेर नगरीतील समस्त जनतेच्या संरक्षणासाठी १ कोटी रूपयांचे सीसीटीव्हीचे जाळे शहरामध्ये लावण्यात आले.
सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्र सुखमय आणि समृध्द व्हावे, याकरीता आपण अनेक योजना राबवित आहोत. आशिष देशमुख जो बोलता है वो करता है और जो नही बोलता है, सिना ठोककर डेफिनेटली करता है. पाटणसावंगी येथील टोल नाका म्हणजे अवैध वसुलीचं केंद्र होतं. विधानसभा निवडणूकीच्या वेळेस मी आपणा सर्वांना हा टोल बंद करण्यासाठी आश्वस्त केलं होतं. हा टोल नाका आपण बंद केला. “सावनेर नवनिर्माण” हा आपला मनोदय आहे आणि ते आकारास येत आहे. सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे चित्र आपल्याला पालटायचे आहे. सावनेर नवनिर्माणसाठी प्रत्येक स्तरावर चांगल्या विचारांच्या लोकांची तसेच सुसंस्कृत, सात्वीक आणि सोज्वळ विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये आपल्या सर्वांची प्रामाणिक साथ हवी आहे.”
यावेळी मंचावर डॉ राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, ॲड अरविंद लोधी, अशोक धोटे, रामराव मोवाडे, पियुष बुरडे, आयुषी धपके, मंदार मंगळे, दिगंबर सुरतकर, प्रमोद हत्ती, प्रमोद पिंपळे, राजू घुगल, तेजस्विनी लाड आदी मान्यवर उपस्थित होते. रावण दहनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी हजारोंच्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता.

