राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई येथील माझगांव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील एका लिपीकाला 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपीकाला अटक केल्यानंतर लिपिकाने थेट अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना कॉल करून लाच स्वीकारल्याची माहिती दिली.
विशेष म्हणजे, न्यायाधीशांनीही रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवल्याने, एसीबीने लिपिकासह न्यायाधीश यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. थेट न्याय देणारे न्यायाधीशच लाच घेताना जाळ्यात अडकल्याने परत एकदा न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे.
15 लाखांची मागणी, 15 लाखांवर स्वीकारले: लाच स्वीकारल्या प्रकरणी न्यायालयातील लिपीक चंद्रकांत हनमंत वासुदेव वय 40 वर्ष याला अटक करण्यात आली. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या जागेच्या वादासंबंधीची केस दिवाणी सत्र न्यायालय माझगांव येथे वर्ग करण्यात आली होती. याच कामासाठी 9 सप्टेंबर 2025 रोजी लिपीक वासुदेव याने तक्रारदाराशी संपर्क साधला. वासुदेव याने न्यायाधीशांच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने निकाल लावण्यासाठी थेट 25 लाख रुपयांची मागणी केली होती. यात 10 लाख रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित 15 लाख रुपये न्यायाधीशांसाठी देणे अपेक्षित असल्याचे त्याने सांगितले होते. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने, तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
न्यायाधीशांची संमती, दोघांविरुद्ध गुन्हा: तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणीमध्ये वासुदेव यांनी 15 लाख रुपयांची लाच घेण्यास मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, 11 नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान वासुदेवने तक्रारदाराकडून 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
अटक झाल्यानंतर वासुदेवने दिवाणी सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी वय 55 वर्ष यांना कॉल करून लाचेची रक्कम स्वीकारल्याची माहिती दिली. न्यायाधीश काझी यांनीही त्यास संमती दर्शवल्याने, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वासुदेवसह न्यायाधीश काझी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
न्यायाधीशांच्या अटकेसाठी परवानगीची मागणी: लाच स्वीकारल्या प्रकरणी लिपिक वासुदेवला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. एसीबीने सांगितले की, न्यायाधीशांच्या अटकेसाठी तसेच त्यांच्या घरझडतीसाठी आवश्यक परवानगी मागण्यात आली आहे, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

