रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- परतूर नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश संपादन करत शहराच्या राजकारणावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्रियंका शहाजी राक्षे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून नगरसेवक पदासाठीही भाजपाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे परतूर नगरपरिषदेत भाजपाची सत्ता अधिक मजबूत झाली असून शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदावर भाजपाचे रत्नमाला सतीश सोनवणे, कुरेशी इजरान मुंशी, अग्रवाल स्नेहा सोनू, चव्हाण प्रकाश पंढरीनाथ, डॉ. प्रदीप सुधाकर सातोंनकर आणि काळे पूजा सावता यांनी विजय मिळवला. सर्व विजयी उमेदवारांचे शहरभर जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके, गुलाल, घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे परतूर शहरात विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.
परतूर नगरपरिषद निवडणुकीत यंदा विक्रमी मतदानाची नोंद झाली. एकूण ३३,०९६ मतदारांपैकी २३,२७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अंतिम मतदान टक्केवारी ७०.३२ इतकी राहिली. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रियंका शहाजी राक्षे यांनी परतूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

