पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा. बॅंकांनी पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे निर्देश. जलयुक्तची जास्तीत जास्त कामे पावसाळ्यापूर्वी करा.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.15:- खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या हंमागात शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बि-बियाणे खते उपलब्ध होणे आवश्यक आहे तसेच जिल्ह्यात कुठेही बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी आज खरीप हंगामपूर्व तयारीचा दुरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्र्यांसह आ.समीर कुणावार हे दुरदृष्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी कार्यालयात आ.दादाराव केचे, प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे यांच्यासह शेतीशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात 4 लाख 30 हजार 944 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात कापूस सर्वाधित 2 लाख 24 हजार 950 हेक्टर, त्यानंतर सोयाबीन 1 लाख 38 हजार 640 हेक्टर, तुर 60 हजार 670 हेक्टर, ज्वारी ख. 5 हजार हेक्टर तर इतर पिके 1 हजार 684 हेक्टर पेरणीचे नियोजन आहे. कापूस पिकाचे 5 हजार 343 क्विंटल बियाणे (11 लाख 24 हजार पाकीटे), सोयाबीनचे 62 हजार 388 क्विंटल, तुर 2 हजार 548 क्विंटल, ज्वारी 400 क्विंटल तर इतर पिकांचे 140 क्विंटल असे एकून 70 हजार 819 क्विंटल बियाणे जिल्ह्याला लागणार आहे. मागणीप्रमाणे जिल्ह्यास बियाणे उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
शेतकऱ्यांना हंगामात पिककर्जाची आवश्यक्ता असते. त्यामुळे पिककर्ज वाटपाचे चांगले नियोजन करा. एकही पात्र शेतकरी या कर्जापासून वंचित राहता कामा नये. यावर्षी जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 900 कोटी तर रब्बीसाठी 300 कोटी याप्रमाणे 1 हजार 200 कोटी रुपयांचे पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. सदर उद्दिष्ट निश्चित केल्याप्रमाणे बॅंकांनी वाटप करणे आवश्यक आहे. याबाबत बॅंकांना स्पष्ट सूचना देण्यात यावे. एकही बॅंक कर्ज वाटपात मागे राहणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले.
यावर्षासाठी सिंचन विभागाने 67 हजार हेक्टरवर सिंचनाचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले पाहिजे. ज्या ठिकाणी प्रकल्पाचे पाणी जात नाही, त्याठिकाणी आ.दादाराव केचे यांच्या सूचनेप्रमाणे पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी काहीच दिवस हातात आहे. त्यामुळे पावसाळ्या पुर्वी जास्तीत जास्त कामे केली जावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आ.समीर कुणावार यांनी खते उपलब्धता, कर्ज वाटप, किसान सन्मानचे वंचित शेतकरी, शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान प्रलंबित प्रकरणे, पिकविमा वाटप आदी मुद्दे उपस्थित केले. आ.केचे यांनी आर्वी येथील बोगस खते कारवाई, निम्न वर्धाचे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे, पैसे भरून प्रलंबित वीज जोडण्या असे विविध विषय उपस्थित केले. आमदारांनी मांडलेल्या विषयांवर तातडीने कारवाईच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. खरीपाचे नियोजनाची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी सादर केली.

